विद्याव्रत संस्कार



संस्कार म्हणजे काय ?

संस्कार म्हणजे इष्ट बदल ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनाचा विकास होऊ शकतो... आपल्यातील अमूर्त चैतन्याला मूर्त रूप देण्यासाठी संस्कारांचा हातभार लागतो, असं मला वाटतं...आपल्या धर्मात १६ संस्कारांची नोंद आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आवश्यकतेनुसार ह्या संस्कारांची रचना केली आहे...

 
भारतीय परंपरेत माणसाच्या आयुष्याची आश्रमांमध्ये विभागणी केली आहे. माणूस १०० वर्ष सुखाने, आनंदाने जगेल असा विचार करून पहिली पंचवीस वर्ष विद्याग्रहणंच केले पाहिजे - स्वतःला पुढील आयुष्यात मोठं काम करण्यासाठी लायक, सक्षम बनवावं, हा झाला ब्रह्मचर्याश्रमाचा काळ. पुढची २५ वर्ष गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यासाश्रम...

ह्या लेखात आपण विद्याव्रताबद्दल अधिक माहिती घेणार असल्याने फक्त ब्रह्माचर्याश्रमाकडे लक्ष देऊ या ...

आपल्याला दिशा देण्यासाठी जीवनाचे ध्येय निश्चित करणे, ते गाठण्याचा संकल्प करणे त्यासाठी व्रताचरण करून स्वतःला सक्षम बनवून विद्याभ्यास करणे हे आजही आवश्यक आहे. परंपरेने चालत आलेली रूढी, रीती रिवाज आज कालबाह्य, अन्याय्य वाटतं असतील तर यांचा मुख्य आशय तसाच ठेऊन त्यांचे बाह्यरूप कालोचित, न्याय्य आणि समानतेला पोषक करण्याचा प्रयत्न करायला हवा...उपनयन संस्काराचा हा मुख्य आशय लक्षात घेऊन एक शैक्षणिक संस्कार म्हणून ज्ञान प्रबोधिनीने 'विद्याव्रत संस्कार' असे त्याचे आधुनिक नामकरण केले गेले. शालेय वयामध्ये असे संस्कार करण्यासाठी भारतीय परंपरेमध्ये उपनयन म्हणजेच विद्याव्रत संस्कार रूढ होता. ज्ञान प्रबोधिनीने सार्वत्रिक शिक्षणाच्या युगामध्ये विद्याव्रत संस्कारात कालानुरूप आशय कृती यांची जोड दिली,

कोणतीही नैसर्गिक अवस्थेतील गोष्ट आपल्याला उपयोगात आणायची असेल तर ती जशीच्या तशी वापरणे फार थोड्या वेळा शक्य  बहुतेक वेळा तिच्यावर प्रक्रिया करून ती वापरण्यायोग्य करावी लागते. एखादी व्यक्ती समाजाला योगदान करण्यास योग्य व्हावी असेल त्या व्यक्तीलाही स्वतःला बदलावे लागते किंवा घडवावे लागते.. ह्यासाठी ज्या गोष्टी नियमितपणे ठरवून कराव्या लागतात त्यांना भारतीय परंपरेमध्ये व्रत असे म्हणतात.

केवळ विद्या शिकून व्यक्तीमध्ये समाजासाठी काही करण्याची क्षमता येत नाही. विद्यार्जनाबरोबर व्रत पालनही करावे लागते. म्हणून प्रबोधिनी मध्ये 'व्यक्तिविकासासाठी विद्याव्रता'ची कल्पना आली. विद्याव्रत म्हणजे विद्यार्जन आणि व्रतपालन दोन्ही एकाच वेळी चालू ठेवणे. विद्यार्जनाने बुद्धी तीक्ष्ण, शीघ्र आणि सूक्ष्म होऊ शकते. व्रत पालनाने बुद्धी व्यापक, सखोल अँड शुद्ध  विद्यार्जन प्रत्येकाच्या बुद्धीच्या आणि आर्थिक क्षमतेप्रमाणे आणि उपलब्ध सार्वजनिक सुविधांप्रमाणे कमी जास्ती होऊ शकेल. पण व्रत पालन करणे सर्वाना शक्य आहे.

मनुष्य जन्माला येतो, मग सुरुवातीला रडणे, हसणे, एवढेच येत असत... हळू हळू प्रकाश, वास, चव, स्पर्श ह्यांचे ज्ञान होऊ लागते. शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक विकसन होऊ लागते. त्याबरोबर अनेक भावभावनांची जाणीव होऊ लागते. बुद्धीच्या मदतीने आपण छोटे छोटे प्रश्न सोडवायला लागतो. 'मी आणि माझं' या पलीकडे 'आम्ही-आपलं' हे कळायला लागतं. देश ह्या गोष्टीची ओळख  प्रार्थनेतून 'देवा'शी बोलायला लागतो - हे सहज घडत असेल का? ह्यावर आपण कधी विचार केलाय का? माझ्यामते ह्या सर्वांमागे संस्कारांचा खूप मोठा प्रभाव आहे.

आपल्यावर होणारे संस्कार हे मानसिक, शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि आत्मिक असतात. ह्यातूनच आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ह्यांचे विकसन  ह्याचबरोबर स्वावलंबी होण्यासाठी आणि समाजाला योगदान करता यावे यासाठी सहभाव आणि इतर अनेक
मनोवृत्ती घडाव्या लागतात. असे वृत्ती घडणे केवळ पुस्तकी शिक्षणातून होत नाही, त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, त्या प्रयत्नांना संस्कार करणे असे म्हणतात.

प्रबोधिनीने पुनर्रचित केलेल्या विद्याव्रत संस्कारामध्ये शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि आत्मिक अशा व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या विविध दिशा दाखवल्या आहेत. या दिशांनी स्वतःचा विकास करण्यासाठी युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्यायप्रवचन, सद्गुरू सेवा आणि राष्ट्र अर्चना हे व्रताचे सहा प्रकार मांडलेले आहेत. प्रत्यक्ष व्रते कोणती घ्यायची म्हणजे स्वतःसाठी आपणहून कोणते नियम ठरवायचे हे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार आणि महत्वाकांक्षेनुसार ठरवावे...

खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीला असे मोठे मोठे शब्द फक्त ऐकूनच माहित आहेत. जे काही मला पटले  किंवा आवडले, त्याचा गर्भितार्थ सरळ सोप्या भाषेत प्रबोधिनीने दिलेली 'व्यक्तीसाठी विद्याव्रत' ह्या पुस्तकामध्ये मांडला आहे. आणि म्हणूनच ह्याच पुस्तकाच्या आधारे वरील मुद्दे मी पुस्तकात जसे आहेत तसेच नमूद केले आहेत.

माझी मुलगी प्रबोधिनीत आठवीत शिकते आहे आणि गेले वर्षभर आम्ही पालक ह्या व्रताबद्दल सतत ऐकत आहोत. मनुष्याचे जीवन समृधदी आकारण्याचा दृष्टीने आणि अखेरीस आपण समाजाचे देणे लागतो हि भावना जागृत ठेवण्यासाठी मनुष्याला अनेक पैलू पाडावे लागतात, त्याचे सखोल विश्लेषण ह्या पुस्तकात दिले आहे. ह्यासाठी शाळेत अनेक व्याख्याने, शिबिरे ह्यांचे आयोजन करण्यात आले होते आणि पुढची दोन वर्ष शाळेत असेपर्यंत ह्या व्रताचा पाठपुरावा केला जाईल. ज्याचा विद्यार्थिनींना नक्कीच उपयोग होईल.

एकंदरीत ह्या संस्काराद्वारे फक्त विद्येचे आदान - प्रदान होणे एवढाच अर्थ नसून व्यक्तिविकसनाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे हेच माझ्यासाठी मुख्य आकर्षण आहे.

पालक ह्या भूमिकेत राहून एखाद्या व्यक्तीच्या योग्य जडण - घडणीमध्ये अनेक घटक अंतर्भूत असतात आणि ह्यांचं योग्य परिणाम साधण्यासाठी दिशादर्शक म्हणून ह्या संस्कारांचा नक्कीच उपयोग होईल अशी खात्री आहे.

मी तर  जाऊन असंही म्हणीन कि ह्या सर्व घटकांची ओळख आज आम्हाला 'विद्याव्रत संस्कार' मुळेच झाली आणि आयुष्याकडे बघण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला एक नवीन आणि सुयोग्य दिशा मिळाली आहे. आणि पालक म्हणून आमची जबाबदारी निश्चितच कितीतरी पटींनी वाढली आहे.

माझा ह्या विषयात काहीही अभ्यास नसल्याने मी इथे थांबते. आज शाळेत झालेल्या ह्या संस्कारामुळे जी माहिती मिळाली ती पटली आणि ती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे. सर्वांना मनापासून सांगू इच्छिते कि मनुष्य घडवण्याचा हा संस्कार आपल्या पाल्यावर जरूर होऊ द्या. अतिशय प्रसन्न आणि श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या ह्या संस्कारांमुळे मनुष्यात योग्य ते बदल नक्कीच घडतील.

-आरूशी दाते










No comments:

Post a Comment

Creative Commons License स.न.वि.वि. नववर्षाभिनंदन अंक २०१७ मधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.

स.न.वि.वि. नववर्षाभिनंदन अंक २०१७ हा ’स.न.वि.वि. फेसबुक समूहाचाच’ एक भाग आहे. सदर अंकामध्ये मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. ह्या अंकातील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा स.न.वि.वि. नववर्षाभिनंदन अंक २०१७ च्या संपादकांशी snvv2016@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.